पिंपरी: विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला सुसाट वेगात आलेल्या एका आलिशान कारने जोरदार धडक दिली. ही धडक जोरात होती, की यामध्ये स्कुल बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, स्कुल बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सायन्स पार्क परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त स्कुल बस शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. सदर बसमधून १५ विद्यार्थी प्रवास करत होते. त्यावेळी समोरून सुसाट वेगाने एक आलिशान कार आली. समोरून वेगात कार येत असल्याचे पाहून बसचालकाने ब्रेक मारला.
परंतु, कारचा वेग अधिक असल्याने तिने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
#WATCH | Maharashtra | A School Bus carrying 15 students collided with a car at BIT road in Pimpri-Chinchwad pic.twitter.com/M7odp7iGxN
— ANI (@ANI) July 29, 2024