राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत जावजीबुवाची वाडी जवळ काही अज्ञातांनी रस्तादुभाजक फोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे येथे रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. तर रस्तादुभाजक फोडणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासुर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत जावजीबुवाची वाडी जवळ काही अज्ञातांनी रस्तादुभाजक सोमवारी (ता.९) ते मंगळवारी (ता.१०) या वेळेत फोडला आहे. महामार्गाच्या मधोमध असणारा रस्ता दुभाजक २० ते २५ फुट फोडला आहे.
ग्रामीण भागातील नागरिक पायी, दुचाकी चारचाकी तुन या फोडलेल्या दुभाजका मधुन दुसऱ्या बाजुला जात आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुने वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागत आहे.
रस्तादुभाजक फोडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे येथे अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणाहून गाड्या वळण युटर्न घेत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, जावजीबुवाची वाडी ( कासुर्डी) येथील महामार्गावरील रस्ता दुभाजक फोडला आहे. या ठिकाणी रिलायन्स व एच.पी पेट्रोल पंप आहेत. पेट्रोल चालकांनी दोन्ही बाजूचे गिऱ्हाईक मिळावे म्हणून तर रस्ता फोडला तर नाही ना. अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगली रंगली आहे.