लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले. आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वत: घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात मंगळवारी (ता. 6) सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
विजय वसंत जाधव (वय-24, रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हि लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जात असते. दरम्यान, पिडीत मुलगी मंगळवारी (ता. 6) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती. तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक आरोपी विजय जाधव तेथे आला. व अल्पवयीन मुलीला म्हणाला चल तुला शाळेला सोडवतो, असे सांगितले.
अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पिडीतेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे. असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतर पिडीतेसोबत लगट करून बळजबरी करू लागला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक करू लागला. मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी पिडीता जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा आरोपी तेथून पळून गेला.
याप्रकरणी पिडीता यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी विजय जाधव हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
रिक्षाचालकांवर विश्वास कसा ठेवायचा…
पूर्व हवेलीत शैक्षणिक दृष्ट्या अनेक नामवंत शाळा व संकुले आहेत. त्यामुळे या ठिकाणी देशाच्या काना कोपऱ्यातून हजारो विद्यार्थी येत असतात. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी बस अथवा रिक्षाचा वापर करतात. मात्र रिक्षाचालकच विद्यार्थिनीचा विनयभंग करीत असतील तर विश्वास नेमका कोणावर ठेवायचा? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.