-बापू मुळीक
सासवड : आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची पुरंदर जन्मभूमी असल्याने त्यांच्या कार्याला साजेसे असे स्मारक व पुर्णाकृती पुतळा सासवड शहरात उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले. तालुक्यातील दिवे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे, त्या प्रसंगी जगताप बोलत होते.
उमाजी नाईक यांचे सातवे वंशज चंद्रकांत खोमणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जय मल्हार क्रांती संघटना राज्य अध्यक्ष दौलतनाना शितोळे व भाजपा नेते बाबाराजे जाधवराव प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारने नुकताच राज्यातील सर्व आयटीआय केंद्राचे नामांतर करण्याचा अध्यादेश काढला असुन त्या अनुषंगाने हे नामांतरण कऱण्यात आले आहे. भिवडी येथील राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देखील पावले उचलली जातील असे आश्वासन संजय जगताप यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाच्यावेळी संस्थेचे प्राचार्य राजेश धानोरकर यांनी प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत केले. बाबाराजे जाधवराव यांनी या वेळी संस्थेचा परिसर आनंददायी वाटला पाहिजे तसेच कोर्स संख्या वाढवावी, असे आवाहन केले. संघटनेचे नेते दौलत नाना शितोळे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले व सासवड येथे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच भिवडी येथे स्मारकासाठी अधिक जागा संपादन करून भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर समाज बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बहिर्जी नाईक यांच्या बाबत सरकार उदासीन असल्याची खंत देखील शितोळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, सरपंच योगेश काळे, भिवडीच्या सरपंच श्वेता चव्हाण, माजी सरपंच गुलाब झेंडे, साहेबराव जाधव, बिट्टूशेठ भांडवलकर, लालासो भांडवलकर, गंगाराम जाधव, चेतन महाजन, हनुमंत भांडवलकर, विलास कडलग, अप्पा भांडवलकर, मनोहर ताथवडकर आदी उपस्थित होते