केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी रामदास गरुड यांनी आपली दिवंगत पत्नी सुशीला गरुड यांच्या स्मरणार्थ खुटबाव गावच्या मुख्य चौकात 6 लाख रुपये खर्चून शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारली आहे. यामुळे गावच्या सौंदर्यात भर पडत आहे.
माझी आमदार रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून व माझी सरपंच शिवाजी थोरात तसेच जी. के. थोरात, भाऊसाहेब ढमढरे यांच्या पुढाकारातून गावच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्चून राशी गार्डन साकारले होते. हे राशी गार्डन रोड लगत असल्याने हजारो प्रवाशाची नजर पडताच त्या ठिकाणी जाण्याची सर्वाची उत्सुकता वाढत असे. परंतु या गार्डन ला प्रवेशद्वार नसल्याने रामदास गरुड यांच्या निदर्शनास येताच त्यानी गावकऱ्यांशी चर्चा केली. व त्याठिकाणी प्रवेशद्वार नसल्याने हे गार्डन अधुरे वाटत असल्याचे पटवून दिले. व स्वतः गार्डन ला प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले.
अवघ्या पाच ते सहा महिन्यात शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारत गावाच्या विकासात भर टाकली आहे. त्या शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीला दरवाजा बसवून त्यावरती आपलं खुटबाव असा बोर्ड बसवला आहे. दरवाज्याच्या दोन्हीं बाजूस बुरुज बांधले आहेत. बुरुजाच्या शेजारी दोन हत्ती बसवले आहेत. हि प्रतिकृती पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ येत आहेत. यामुळे गावच्या वैभवात निश्चितच भर पडत असल्याचे मत सरपंच गीता शितोळे यांनी व्यक्त केले. या प्रतिकृतीचे उद्घाटन माझी आमदार रमेश थोरात थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.