पिरंगुट : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पत्रकार असल्याचे बोगस ओळखपत्र दाखवून दुकानदाराला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील चार जणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून बोगस ओळखपत्र व एक मोटार जप्त करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी सात ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
हिमांशू दुबे, विजय झा, रोहीन केदारसिंग पटेल (सर्व रा. कळवा, ठाणे), जितेंद्र कमलाशंकर शर्मा (रा. नालासोपारा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी इमामुद्दीन गफूर खान (वय-३४, रा. पिरंगुट, ता. मुळशी, मूळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमामुद्दीन खान यांचे पिरंगुट कॅम्प भागात किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी हिमांशू दुबे, जितेंद्र शर्मा, विजय झा व रोहीन पटेल यांनी खान यांच्या दुकानात प्रवेश केला. आम्ही ठाण्यातील कळवा येथील हमारा फाउंडेशनमधून आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी खान यांना पत्रकार व एनजीओची बोगस ओळखपत्रं दाखवली. तसेच दुकानातील मालाची तपासणी करून त्यातील गुटख्याचा माल बाहेर काढण्यास सांगितला.
आम्ही तुझी तक्रार पोलिस ठाण्यात करणार आहोत. तुझे दुकान सील करतो, तुला तुरुंगात पाठवतो, अशी भीती दाखविली. हे प्रकरण मिटवायचे असेल व पोलिसांत तक्रार करायची नसल्यास दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून त्यांनी खानकडे अडीच लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी खान यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.