पुणे : सध्या असलेल्या पुणे स्थानकावर असलेला भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन हडपसर टर्मिनलवरून जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्प्ष्ट केले आहे.
सध्याच्या घडीला हडपसर टर्मिनलवरून केवळ हडपसर – हैदराबाद व हडपसर नांदेड या दोनच गाड्या सोडण्यात येत आहे. या दोन गाड्या वगळता अजून कोणत्याही गाड्या या टर्मिनलवरून सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे या टर्मिनलवरून अजून काही एक्सप्रेस गाड्या सोडता येऊ शकतात का, याचे नियोजन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पुणे स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणात गाड्याचे आवक -जावक सुरु असते. त्यामुळे येथे वाहतुकीवर देखील ताण पडतो. त्यामुळे हडपसर टर्मिनलवरून गाड्या सोडल्यास पुणे स्थानकावरील ताण देखील कमी होण्याची शक्यता आहे.
त्यातच हडपसरच्या विकासासाठी केंद्राच्या बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली असून रेल्वे टर्मिनसचा देखील विकास होणार आहे. त्यामुळे जास्तीच्या गाड्या हडपसर येथून सोडाव्यात असा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.