रांजणगाव गणपती: महाशिवरात्रीनिमित्त शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या जुने शिरुर येथील प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या पालखीची शिरुर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. येथील शिवसेवा मंदिरात दुपारी सव्वा दोन वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अॅड अशोक पवार, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, दादा पाटील फराटे, दादा पाटील घावटे, राहुल पाचर्णे, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, देवस्थान ट्रस्टचे सहचिटणीस तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे, विश्वस्त वाल्मिकराव कुरुंदळे, गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे, पोपटराव दसगुडे, नामदेव घावटे, बलदेव परदेशी, सल्लागार जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डीले आदिसह नागरिक उपस्थित होते.
‘रामलिंग महाराज कि जय’ चा जयघोष करत आरती झाल्यानंतर पालखीचे भक्तिमय वातावरणात शिरुर शहरातून श्री रामलिंग मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळा शहराच्या मुख्य पेठामध्ये आल्यावर भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे मोठया उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा पाच कंदील चौकात आल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी बाळ गोपाळासह महिला आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी मिरवणुकीत अग्रभागी अंबड, जि. जालना येथील सरस्वती ब्रास बँड, मावळ येथील लेझिम व झाज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बारामती येथील अमर, चाळीसगाव येथील सद्गुरु आणि जालना येथील सरस्वती बँड पथक सहभागी झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त पालखी जाणाऱ्या सर्व मार्गांवर पताका लावण्यात आल्या होत्या, तर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
दरम्यान,पालखीमुळे शिरुर शहरात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
“महाशिवरात्रीनिमित्त मंदिर, कळस आणि परिसराला रंगरंगोटी करण्यात आली असून, रामलिंग मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्री बुधवारी, दि.२६ रोजी असून,या दिवशी रामलिंग मंदिरातील शिवलिंगावर पंचगंगेच्या पवित्र जलाने महारुद्राभिषेक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार असून, त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. तर गुरुवारी,दि.२७ रोजी जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या घाटावर बैलगाडा शर्यत होणार असून, या बैलगाडा शर्यतीसाठी सुमारे सहा लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत”.
– प्रभू श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट