पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या दरवाज्यावर लाथ का मारली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
नवाज नासिर खान (वय २७, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रफिया खान, नासिर खान, सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू माधवराव चिद्रावार (वय २५, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवाज खान याने फिर्यादी राजू चिद्रावार यांच्या घराच्या दारावर लाथ मारली होती. याचाच जाब विचारण्यासाठी राजू, त्यांची पत्नी मीरा आणि त्यांचा मानलेला भाऊ गणेश कांबळे हे सर्व नवाज खानच्या घरी गेले होते. त्यावेळी नवाज खान त्याची आई रफिया खान, नासिर खान यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली.
धक्कादायक बाब म्हणजे मीरा गर्भवती असल्याचे आरोपींना माहीत असताना देखील तिच्या पोटावर लाथ मारण्यात आली. त्यानंतर नवाजने राजू यांच्या दुचाकीवर दगड मारला. तसेच आरोपी सलमानने पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मीराच्या पोटावर लाथ मारल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख तपास करत आहेत.