दिनेश सोनवणे
दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड (ता. दौंड) व पंचक्रोशीत दैनंदिन लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वाढत आहे. तसेच वरवंड हे गाव मध्यवर्ती असल्याने येथे शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस चौकी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वरवंड येथे पोलीस चौकी स्थापन करावी. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांच्याकडे दिले आहे.वरवंड हे मोठे गाव असल्याने येथील बाजारपेठही मोठी आहे. याशिवाय शाळा, लहानमोठी रुग्णालये आणि अन्य मानवी गरजेचे व्यवहार या गावात होतात.
आसपसच्या पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ या गावांसह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचा याठिकाणी मोठा राबता असतो. या सर्वांची सुरक्षा अत्यावश्यक बाब आहे.
दरम्यान, याशिवाय लहानमोठ्या तंटा, वाद अथवा अन्य सुरक्षाविषयक गोष्टींसाठी स्वतःची आपल्या गावातच पोलीस चौकी असावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तरी लवकरात लवकर याठिकाणी पोलीस चौकी स्थापित करण्यात याव. असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.