पिंपरी-चिंचवड : देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांनी महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. विद्यार्थ्यांच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सगळा प्लॅन रचल्याचे उघड झाले असून, अपहरण, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून चारजणांना अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. विद्यार्थीच असणाऱ्या अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी किवळे येथील सिंबायोसिस या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना अटक करण्यात आली आहे.
किवळे येथील सिंबायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. विद्यार्थीच असलेले चार आरोपी व चौहान एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चौहान हा महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहतो. पैशांची गरज असल्याने आरोपींनी चौहानला लुटण्याचा प्लॅन केला होता. काही महिन्यांपूर्वी गस्तीवर असताना दोन पोलिसांनी चौधरी, शेख, डांगे यांना हटकले होते. यावेळी त्यांची ओळख झाली होती. त्यातूनच भविष्यात काही काम असल्यास सांगा हे गायकवाड, शेजाळ त्यांना सांगायला विसरले नव्हते. त्यातूनच आरोपींनी प्लॅनमध्ये पोलिसांना सामावून घेतले. त्यानुसार १० फेब्रुवारीला दुपारी सव्वा बारा वाजता आरोपींनी गांजासदृश पाने असलेली एक पुडी चौहानच्या खिशात टाकली. त्यानंतर हे सगळेजण किवळे येथील कॅफे मायाज लॉन्ज येथे गेले. तेथे पोलीस कर्मचारी गायकवाड आणि शेजाळ हे ठरल्यानुसार पोहोचले. सर्वांच्या खिशांची तपासणी केल्यावर चौहानच्या खिशात आरोपींनी टाकलेली पुडी गायकवाड, शेजाळ यांनी बाहेर काढली. त्यानंतर चौहानसह सगळे गहुंजे स्टेडियम येथे गेले.
दरम्यान, या प्रकरणात चौहान याला अडकवून जबरदस्तीने कॅफे आणि गहुंजे येथे नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला इतरांसह देहूरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देत चौहान याच्या वडिलांशी संपर्क करण्यात आला. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. पोलिसांसह अन्य लोकांच्या धमकीला घाबरलेल्या चौहानच्या वडिलांनी गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना वेगवेगळ्या अकाऊंटवर चार लाख ९८ हजार रुपये दिले.
या सगळ्या प्रकारानंतर एका परिचिताच्या मदतीने चौहान हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याने घडलेला प्रकार वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कानावर घातला. पोलिसांचा थेट सहभाग असल्याने तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची कल्पना देण्यात आली. त्यानंतर चौहानने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप असणारे पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड, सचिन शेजाळ आणि शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांचा तपास पथकाने शोध घेतला असता ते आढळले नाहीत. ते पसार झाले असे आयुक्तालयाकडून कळविण्यात आले आहे. बदल्यांच्या घोळात पोलीस ठाण्यांना निरीक्षक अद्याप नेमण्यात आलेले नाहीत. शहरातील पाचहून अधिक निरीक्षकांनी त्यांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांना “मॅट” न्याय प्राधिकरणात आव्हान दिले आहे. त्यामुळे शहरातून बदली झालेल्या आणि त्या ठिकाणी नवीन निरीक्षक नेमणूक करण्यात न आलेल्या ठिकाणचा कारभार सहायक निरीक्षक चालवत आहेत. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे.