लोणी काळभोर, ता. 14 : जुन्या भांडणाच्या राग मनात धरून एकाच्या घरावर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात रविवारी (ता.13) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली आहे.
फिरोज मंहम्मद शेख (वय २९ , रा. घोरपडे वस्ती , लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) व प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २१, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आस्लम अन्वर शेख ( वय २५ , रा. जयहिंद नगर झोपडपट्टी, कदमवाकवस्ती लोणी स्टेशन, ता. हवेली, जि. पुणे) व इतर तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद साहेबराव झेंडे ( वय ३८ , रा. लोणी स्टेशन, इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झेंडे व आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी फिरोज शेख, प्रसाद जेठीथोर व त्यांचे चार सहकारी हे झेंडे यांच्या घरासमोर धारधार शस्त्र व लाकडी दांडके घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी घराच्या दरवाजावर धारधार शस्त्राने तसेच लाकडी दांडक्याने मारुन दरवाजाचे नुकसान केले. तसेच आरोपींनी रिक्षाची काच फोडली. व घराशेजारील शेजारील बाबा पान शॉपचे शटरवर धारधार शस्त्राने हल्ला कडून शॉपचे नुकसान केले
याप्रकरणी विनोद झेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील 6 आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२),१८९(३),१८९(४),१८९ (६), ३५१(२), ३५२ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२, क्रिमिनल लॉ अमेनमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी फिरोज शेख व प्रसाद जेठीथोर याला 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित चार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.