पुणे : लोखंडी रॉड स्वस्त दरात मिळवून देतो, असे सांगून लखनौमधील एका व्यापाऱ्यास ३८ लाख रुपयांची केल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
केशव झा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकणी लखनौमधील एका व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी केशव झा याने आपण लोखंडी रॉडचे व्यापारी आहोत, असे सांगितले. तसेच तुम्हाला लोखंडी रॉड स्वस्त दरात मिळवून देऊ, असे सांगत विश्वास संपादन केला. स्वस्तात माल मिळत असल्याने लखनऊ येथील व्यापाऱ्याने त्यास होकार दिला.
त्यासाठी ३८ लाख रुपये दिले, परंतु पैसे देऊन माल मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी लखनऊ पोलिसांचे पथक पुण्याला आले. त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलीस आरोपीला घेऊन लखनऊकडे रवाना झाले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.