पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात शेतमाल घेऊन चाललेल्या ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोकड लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रकाश उर्फ पक्या देवराम परिहार (रा. राम मंदिराजवळ, लोहियाननगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत किशोर भागचंद रोमण (वय ३१, रा. पोवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमण हे मार्केट यार्डातील फळबाजारात शेतमाल घेऊन आले असता, केळी बाजारात त्यांनी ट्रक लावला. परिहार याने रोमण यांना चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाला. दरम्यान, रोमण यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली.
रोमण यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वेगवान तपास करत परिहार याला ताब्यात घेतले. परिहार हा सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे करत आहेत.