पुणे : किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलावर (वय १७) ‘रागाने का बघतो’ अशी विचारणा करत, चार जणांनी हल्ला करुन कोयत्याने गंभीर वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील संभाजीनगर परिसरातील धनकवडी येथील हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी (ता. १९) रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रमेश रामभाऊ कचरे (वय १७, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विक्की कांबळे (वय २४) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश हा शुक्रवारी (ता. १९) त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हनुमान मंदिराजवळ गेला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने रमेश याला अडवून त्याच्याकडे रागाने पाहिले. त्यावेळी रमेश याच्या मित्राने आरोपीला ‘रागाने का बघतो’ अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी व रमेश याच्या मित्रासोबत वाद झाले. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.
दरम्यान, फिर्यादी रमेश हनुमान मंदिराजवळ पताका लावत होता. त्याचवेळी अल्पवयीन आरोपी व त्याचे इतर साथीदार हातात कोयते घेऊन आले. त्यांनी रमेश कचरे याला शिवीगाळ करुन तोंडावर मारले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने गंभीर वार करुन जखमी केले.