दौड : पुणे जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे ज्ञानाचे धडे दिले जातात अशा शिक्षण क्षेत्रात सध्या विकृतीने कळस गाठला आहे. विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्याथ्यनि अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार केला. आणि नंतर तिचा खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २२) दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, आपल्या शाळेची बदनामी होईल म्हणून हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलांची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. फिर्यादी विद्यार्थिनीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली होती. त्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पीडित विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिला मारून टाकण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.
मात्र, त्या विद्यार्थ्याने याबाबतची सर्व माहिती पीडितेला दिली. त्यानंतर पीडितेने तिच्या घरी हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर मुलीनेच दौंड पोलिसांत धाव घेतली.
पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महिला सहायक पोलिस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी पीडितेवर घाणेरडे आरोप केले. पीडितेनेच १०० रुपये दिले होते व ती विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचे लेखी जबाब तीन विद्यार्थ्यांसह एका वर्गशिक्षकाकडून घेण्यात आले होते. तसेच, मुलीनेच विद्यार्थ्याला १०० रुपये दिल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापकांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका, असे सुचविले. हे गंभीर प्रकरण लपविण्यासाठी व शाळेची बदनामी होऊ नये म्हणून मुख्याध्यापक व दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून दुर्लक्ष केले. त्यामुळे पीडितेचे मानसिक व शैक्षणिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.