पुणे : पुण्यात सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार एप्रिल ते जून 2023 या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 17 वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून समीर शेख उर्फ सोनू (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे परिचयाचे आहेत. आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या सोबत बोलण्याच्या बहाण्याने बिल्डिंगच्या नळावर येऊन जवळीक साधली.
त्यानंतर पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून जबरदस्तीने घरात घुसून मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर असल्याचे आरोपीला समजल्यानंतर त्याने मुलीला याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने घाबरून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.