पुणे : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. घरातून ट्युशनला जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून, तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नाना पेठेत राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (ता. २०) खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन यशराज दिनेश पाटोळे (रा. गंजपेठ, सावधान मंडळा शेजारी, पुणे) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी किराड हौद परसिरातील एका क्लासच्या समोर घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी किराड हौद परिसरात एका क्लासला जाताना व येताना आरोपी रस्त्यात थांबून तिच्याकडे पाहत होता. याबाबत मुलीने त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने ‘तू मला खूप आवडतेस’ असे म्हणत मोबाईल नंबर मागितला. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही.
दरम्यान, आरोपीने त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मुलीला देऊन फोन करण्यास सांगितले. तसेच फोन न केल्यास घरी येऊन तमाशा करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीला फोन केला असता, त्याने भेटण्यासाठी बोलावले. मात्र, तिने भेटण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने तिला भररस्त्यात अडवून, अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली होती.
दरम्यान, घरात मुलगी दडपणाखाली वावरत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी संशय आला. त्यांनी याबाबत मुलीकडे विचारणा केली. त्यावेळी मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी आरोपीच्या नंबरवर फोन केला असता, त्याने मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.