पुणे : पुण्यातील 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिष दाखवून गुजरातला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मे 2023 ते 10 जून 2024 या कालावधीत कोंढवा, गोवा आणि गुजरात या ठिकाणी घडला.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या 39 वर्षीय वडिलांनी मंगळवारी (दि.11) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजु रामनाथ गुप्ता (वय-23 रा. मोतीराम, जि. गोरखपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलशीसोबत ओळख निर्माण केली. त्या ओळखीतून मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला त्यांच्या संमतीशिवाय पळवून नेत मुलीला गोवा येथे घेऊन गेला.
तेथून गुजरात मधील बडोदरा येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. आरोपीने बहिण बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. सुरवसे करीत आहेत.