पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? शहरात सातत्याने कोयता गॅंगचा धुमाकूळ, गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूलसमोर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
या घटनेत दहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये टेम्पो आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात एका स्वारगेट पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणाने दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याने महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूल समोर लावलेला टेम्पो, तीन चाकी मालवाहतूक करणारा टेम्पो आणि मोठा टेम्पो अशा वाहनांवर धारधार हत्याराने घाव घातलेत. वाहनांची तोडफोड करून त्यांचं नुकसान केलं आहे. या अल्पवयीन तरुणाने याआधी देखील असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.