हडपसर, (पुणे) : मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन 27 वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. ऑगस्ट 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत हि घटना घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार धाराशिव येथील एका युवकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ब्रह्मदेव विठ्ठल मांजरे (वय-26 रा. परांडा जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे त्यांच्या मैत्रिणीसोबत वाद झाले होते. आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी विवाहित महिलेला हडपसर येथे बोलावून घेतले होते. हडपसर येथे आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच आरोपीने त्याच्या खोलीवर नेऊन महिलेसोबत संबंध ठेवून त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो काढले.
दरम्यान, ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच पतीची नोकरी घालवण्याची धमकी देऊन पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.