अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : आई- वडीलांकडुन घराचे बांधकाम करण्याकरीता माहेरुन ५० हजार रुपये आणण्याचा तगादा तसेच सासरच्या जाचाला कंटाळून २५ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तेजश्री कृष्णा नाईक (वय- २५ सध्या, रा. कारेगाव) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी रेवनाथ तुळशीराम होले (वय 52, व्यवसाय. शेती, रा. होलेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी कृष्णा हनुमंत नाईक, मिराबाई हनुमंत नाईक, राहुल हनुमत नाईक, सायली राहुल नाईक (सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्रीचे लग्न कृष्णा नाईक यांचेसोबत 09 डिसेंबर 2020 रोजी झाले. तेजश्री तिच्या पती आणि सासरच्यांसमवेत कारेगाव येथे कामानिमित्त राहण्यास आहे. लग्न झाल्यानंतर मुलीस 2 वर्षानंतर नवरा कृष्णा नाईक, सासु मिराबाई नाईक, दिर राहुल नाईक, जाऊ सायली नाईक यांनी तेजश्रीला संगणमत करुन त्रास देण्यास सुरुवात केले.
तेजश्रीला आई- वडीलांकडुन घराचे बांधकाम करण्याकरीता 50 हजार रुपये घेवुन ये असा तगादा लावला. एवढंच नाही तर तिला सतत जाच आणि मानसिक छळ तसेच मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिडके करत आहेत.