पुणे : पुण्यातून एक बातमीस समोर येत आहे. चांगल्या वर्तवणुकीमुळे खुल्या कारागृहात ठेवण्यात आलेला जन्मठेपेचा कैदी हा पळून गेला होता. त्याला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या कैद्याचे नाव आहे. खुल्या कारागृहात जरी तो आला असला तरी तो काही दिवसातच रोजच्या त्याच त्या दैनंदिनीला तो कंटाळला होता. तो संधीची वाटच बघत होता, संधी मिळताच त्याने एकच धुम ठोकली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. त्याला सत्र न्यायालयाकडून २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अशी माहिती मिळत आहे. १९ ऑगस्ट रोजी सर्वांची नजर चुकवून तो पळून गेला होता.
व्हॉटसअपवर मिळाला होता मेसेज..
भारत बंदच्या अनुशंगाने २१ ऑगस्ट रोजी बंदोबस्त लावला होता. महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे हे मार्केटयार्डमधील शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना माकेटयार्ड गेट नं. १ जवळील रिक्षाजवळ एक व्यक्ती संशयितरित्या उभा असलेला दिसून आला. महिला अंमलदार वेदपाठक यांना राजू दुसाने कारागृहातून पळून गेल्याचा मेसेज व्हॉटसअपवर मिळाला होता. त्यावरील फोटोमधील मिळत्या जुळत्या वर्णनाची व्यक्ती ती दिसत होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला नाव पत्ता विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.
पोलिसांना घाबरुन तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या सहकार्यांच्या मदतीने थोड्याच अंतरावर त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता त्यावेळी त्याने आपले नाव राजू पंढरीनाथ दुसाने असे सांगितले. येरवडा पोलीस ठाण्यात फोन करुन खात्री करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळला..
येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली असली तरी तेथील रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळला असल्याने आपण पळून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले. सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे यांनी केली आहे.