संदिप टूले
केडगाव : आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असल्याकारणाने दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण हे दिवसेंदिवस गरम होत चालले आहे. गेली दोन दिवस एक पत्र सोशल मीडियावर वाऱ्या सारखे फिरत आहे. या पत्राने मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट आणि शरद पवार गट) यांच्यात काहीच अलबेल नसल्याचे चित्र निर्माण केले आहे.
कारण दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनीही आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकता दर्शवली असल्याची चर्चा आहे. तसे रमेश थोरात यांनी बोलूनही दाखवले होते. त्यामुळे महायुतीला तर हादरा बसलाच, पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातही खळबळ उडाली आहे.
शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार मात्र अस्वस्थ झाले आहेत. तसेच त्यांचे कार्यकर्ते मात्र याला उघडपणे विरोध करताना दिसत असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे रमेश थोरात त्यांची उमेदवारी अडचणीत सापडली जाणार असल्याचे चित्र आहे. तसेच पत्रामार्फत दौंडमध्ये शरद पवार गटात निष्ठवंतांनाच उमेदवारी मिळावी.
बाहेरच्याला नको असा सूर या गटाकडून निघू लागला आहे. त्यासाठी तालुक्यातील हजारो निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पत्रव्यवहार करनार असल्याचे एक कार्यकर्त्याने सांगितले. त्यातीलच हे एक पत्र असून पूर्ण तालुकाभर या पत्राची चर्चा रंगली आहे.
या पत्रात बाहेरील उमेदवाराला उमेदवारी देऊ नये असा कार्यकर्त्यांचा आग्रह दिसून येत आहे. पक्षासाठी निष्ठावंत असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला आगामी विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करू लागले आहेत. त्यामुळे दौंडला आगामी विधानसभेसाठी शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.