अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : १० जून पारोडी(ता. शिरूर) येथे बिबट्याने रात्री मेंढ्यांच्या कळपावरती केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बिबट्याच्या हल्ल्यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रामभाऊ बाबा येळे (रा. पारोडी, ता. शिरूर) यांच्या घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात मेंढ्यांचा आवाज येऊ लागल्याने येळे व त्यांच्या कुटुंबीयांनी कळपाकडे धाव घेतली. तर कळपावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनात आले. बिबट्याने दहा फूट भिंतीवरून प्रवेश करून कळपातील मेंढ्यांवर हल्ला केला त्यात एक मेंढी ठार तर दुसऱ्या मेंढीला पंजाने व दाताने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर येळे कुटुंबीयांनी काठीचा आवाज केला त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
पारोडी सातकरवाडी येळे वस्ती इंगळे नगर दहिवडी निमगाव म्हाळुंगी या परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु सोमवारी रात्री बिबट्याने पारोडी परिसरात अक्षरशः हैदोस घातला. मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला असून, लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा वनविभागाने ताबोडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पशुधनावर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात भाऊसाहेब येळे व इतर नागरिकांनी वनरक्षक प्रमोद पाटील यांना रात्री पंधरा ते वीस वेळा कॉल करूनही पाटील यांनी फोन उचलला नाही. वन विभागाच्या अधिका-यांकडून फक्त पंचनामाच केला जातो. नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करून देखील वनविभागाने काही पिंजरा लावला नाही. त्यामुळे आता जीवितहानी झाल्यावरच काविभाग पिंजरा लावणार का? असा प्रश्न येळे कुटुंबांनी उपस्थित केला.
पारोडी ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करावे. अशी मागणी ग्रामस्थ करत असून. मानवी वस्तीतील बिनधास्त वावर, बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे लोकांसह शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पारोडी ग्रामपंचायत कर्मचारी सुशांत टेमगिरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगितले.