राजगुरुनगर,(पुणे) : चांडोली येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात टेस्टिंग रूम मध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी झाली आणि कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. बुधवारी १० जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या घुसला. कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ शांता संभाजी शेळके यांनी बिबट्याला दरवाजातून घुसताना पाहून न घाबरता बाहेर येऊन दरवाजा बंद केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मोठी वर्दळ असताना आणि अनेक अधिकारी कर्मचारी कार्यालयात कामात व्यस्त असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बिबट्या कार्यालयात घुसल्याची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती. काही वेळाने वनविभागाचे पथक या ठिकाणी आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मागील पाच दिवसांपासुन बिबट्या मादीसह बछडे महावितरण कार्यालगत आढळून आले होते. दरम्यान, बिबट्या महावितरण कार्यालयात शिरल्याने कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.