पुणे : दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्याकरिता वकीलाच्या फी व्यतिरिक्त ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वकिलाला रंगेहाथ पकडले आहे. माधव वसंत नाशिककर (वय-६१, व्यवसाय वकील, रा. पदमावती) असे रंगेहाथ पकडलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी वनराज रसवंती गृहासमोर खडकमाळ आळी येथे केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे नावे सदनिका खरेदी केली आहे. त्याची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय, क्र. १. हवेली, पुणे येथे केली होती. तक्रारदार यांनी दस्त नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी शासकीय फी (स्टॅम्प डयुटी, नोंदणी फी व डॉक्युमेंट हाताळणी फी) एन. ई. एफ. टी. द्वारे ऑनलाईन जमा केली होती.
तसेच दस्ताची नोंदणी झाल्यानंतर वकीलाची फी खाजगी वकील माधव नाशिककर यांना दिलेली होती. त्यानंतर नाशिककर यांनी दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दस्त नोंदणी अधिकारी यांचेकरीता वकीलाच्या फी व्यतिरिक्त तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रादार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, खाजगी वकील माधव नाशिककर यांनी तक्रारदार यांचे दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दस्त नोंदणी अधिकारी यांचेकरीता ५ हजार रुपये पंचासमक्ष तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, नाशिककर यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये ३ हजार रुपये लाच पंचासमक्ष स्विकारले असता त्याना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.