पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात वकील दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दुचाकीवरून जाणाऱ्या वकील दाम्पत्याला भररस्त्यात अडवून दमदाटी करत मारहाण केली. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केला आहे. ही घटना रविवारी १८ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरातील जगदंबा भवन रोडवरील आधार डेरी समोर घडली आहे.
याप्रकरणी मोहमद याकुब शेख (वय-३७ रा. पिसोळी) यांनी सोमवारी १९ फेब्रुवारीला कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन वसीम इकबाल खान (रा. गार्डनीया, फेज-२ वडगाव शेऱी, पुणे) आणि युनुस त्रासगर (रा. ताज मंडील, वडाची वाडी, उंड्री) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी मोहमद शेख आणि त्यांच्या पत्नीचा वकीली व्यवसाय आहे. आरोपी वसीम खान आणि शेख हे एकाच सोसायटीमध्ये राहत आहे. फिर्यादी शेख यांच्या पत्नीने एका प्रकरणात वकील पत्र घेतले आहे. वसीम खान याने वकील पत्र घेऊ नये यासाठी फिर्य़ादी यांच्या पत्नीला धमकी दिली होती. याप्रकरणी वसीम खान याच्याविरोधात कोंढवा पोलिसांनी धमकावणे आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरुन त्याने आणि त्याच्या बहिणीने फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला होता.
याप्रकरणी फिर्यादी यांनी वसीम याच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी वसीम विरोधात दोषारोपत्र दाखल केले होते. मात्र तो फरार असल्याचे पोलिसांनी दाखवले होते. त्यामुळे हा गुन्हा हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरु करण्यात आला होता. तसेच फिर्यादी यांनी वसीमचा पत्ता शोधून पोलिसांना सांगितला होता. याचा देखील राग वसीमच्या मनात होता.
रविवारी १८ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेख आणि त्यांच्या पत्नी कोंढवा पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी अडवून फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन बुर्खा ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांना गॅस पाईपने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीने मध्यस्थी केली असता त्यांना देखील मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.