मांडवगण फराटा : कामावर दारू पिऊन आल्याने झालेल्या वादातील झटापटीत ऊसाच्या गुऱ्हाळातील गरम रसात पडलेल्या जखमी कामगाराला रुग्णालयात नेतो, असे सांगून जिवंत असतानाच नदीपात्रात फेकून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे २९ सप्टेंबर रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दोघाजणांवर शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरजू (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) असं खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
या प्रकरणी नवनाथ तुकाराम कोडे (वय ४२, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर (सध्या रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, मुळ रा. शीतलगढी, ता. जि. शामली, उतरप्रदेश) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील फिर्यादीचे मालकीचे जमीन गट नं १६ मधील उसाचे गुऱ्हाळामध्ये गुळ बनवण्याचे काम सुरु होते. गुऱ्हाळावरील कामगार सरजू हा दारू पिऊन आल्याने शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर यांच्याशी सरजूचे काम करण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाले. त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये सरजू हा तोल जाऊन उसाच्या गरम रसाच्या कढईत पडला.
त्यावेळी सरजूला कढईच्या बाहेर काढून भाजल्यामुळे जखमी अवस्थेत त्याला गाडीवर बसवून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी जिवंत असतानाच भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत फिर्याद दाखल झाल्याने शिरूर पोलीस ठाण्यात दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.