पुणे : पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे. ही घटना आज (दि. २५) रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निहाल सिंग असं हल्ला केलेल्या आरोपीचे नावे आहे.
पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता, तोही रेकॉडवरील आरोपी आहे. या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आलं होतं.
नेमक काय घडल?
दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड हे आरोपींना पकडण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरच जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेले गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच…
कोयता गँगच्या रडारवर पोलीसच आल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. याआधीही पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शहरातून धिंडही काढली होती. पण आता कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.