पुरंदर : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातील २० किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नीरा येथील भर बाजारपेठेत असलेल्या अभिजित ज्वेलर्स या दुकानात रात्रीच्या सुमारास घडला असून आज सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आला आहे. दिवाळीचा हंगाम असल्याने या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने – चांदीचेदागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यातील सुमारे २० किलो चांदीचे दागिनेचोरीला गेल्याची माहिती दुकान मालक विजयकुमार मैढ यांनी दिली आहे.
या घटनेनंतर नीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, यामध्ये २० किलो चांदीचे दागिने चोरीला गेले असून चोरांना तिजोरी फोडता आली नसल्याने सोन्याचे दागिने मात्र सुरक्षित राहिले असल्याची माहिती दुकानदार विजयकुमार यांनी दिली आहे. सोन्याचे दागिने वाचले असले तरी दुकानदाराचे वीस किलो चांदी चोरीला गेले असल्याने त्याचे जवळपास १९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असंही विजयकुमार यांनी यावेळी सांगितले.
चोरटयांनी शटरचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून चांदीचे दागिने चोरून नेले. त्याचबरोबर चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. तसेच शेजारील हॉटेल व्यावसायिकाच्या दुकान बाहेरील सिसीटीव्ही कॅमेरांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे या चोरांचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभा राहिलं आहे.