अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातून अपघाताची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना अहमदनगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी येथे १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. प्रियांका सोमनाथ गाडे (रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत मंच्छिद्र अर्जुन टेकाळे (वय-५०, रा. कसबा, ता. बारामती, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रक नंबर एम एब 16 सी डी 1767 वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका १० ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सरदवाडी येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी ट्रक नंबर एम एच 16 सी डी 1767 वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडणाऱ्या प्रियंकाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रफुल्ल भगत करीत आहेत.