दौंड : दौंड शहर बंद करुन संतप्त झालेल्या तरुणांनी आज ६ जुलै रोजी कंपन्यांसमोर अर्धनग्न आंदोलन केले. आज उपोषणाचा सहावा दिवस असून कंपन्यांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि कालच्या (दि. ५) वृत्तपत्रामध्ये चुकीची बातमी देऊन कंपन्यांनी गावची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दौंड शहरातील तरुण चांगलेच आक्रमक झाले असून शंभरहून अधिक नागरिक उपोषणाला बसले आहेत
दरम्यान, तालुक्यातील सहजपुर, नांदुर, कुरकुंभ एम. आय.डि.सी व भांडगाव मधील कंपन्या ज्या स्थानिक तरुणांना रोजगार देत नाहीत त्यांचा निषेध करण्यासाठी व या अत्यंत गंभीर व संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. शहर बंद ठेवून नांदुर, सहजपुर मध्ये सुरु असलेल्या उपोषणाला नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.
सध्या शहरातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शहरातून जवळ जवळ शेकडो व्यापाऱ्यांनी आपले उद्योग व्यावसाय बंद करुन इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. दौंडची बाजारपेठ मोडीत निघत आलेली आहे. याला कारण शहर व परिसरामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. कंपन्या मधून जे चलन आपल्या भागामध्ये फिरले पाहिजे ते फिरत नाही. परप्रांतिय कामगारांना रोजगार देवून आपल्या भागातील रोजगाराची संधी हिरवली जात असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
काय आहेत प्रमुख मागण्या?
१) स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा.
२) नांदुर सहजपुर कंपन्यातील केमिकल्स मिश्रीत पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी, पिण्याचे स्रोत खराब होत असून त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
३) कंपन्यानी कंपनीतील छोटी मोठी कामे स्थानिकांना देणे.
४) सर्व कंपन्यांनी किमान वेतन कायदा पाळवा.
५) नांदुर-सहजपूर कंपन्यातील बॉयलरची उंची शासकीय नियमानुसार नसल्याने त्या बॉयलरच्या राखेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुटंणे, पिके जळणे या अन्यायातून शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळावा.
६) कंपन्यांकडून स्थानिक लोकप्रतिनीधींना मिळणारी अपमानकारक वागणूक थांबावी.
७) सर्व कंपन्यांनी गौण खनिज उत्खनन कायदा पाळावा.