बापू मुळीक
सासवड : पुरंदर किल्ल्याच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून पानवडी आणि पांगारे हे गाव आहे. चारही बाजूंनी डोंगर आणि द्रोणीय स्थितीमध्ये असणाऱ्या जागेत रुद्र गंगेच्या काठावर अगदी निपळीच्या जागेवर गावची वस्ती आहे. जोरदार पाऊस झाला तरी पाणी वाहून जाते. मात्र, गावच्या उत्तरेला दुर्गुडी या नावाने एक दीडशे मीटर उंचीचा कडा आहे.
मराठी शाळेत असताना त्या काळातील गुरुजींनी दुर्गथडी या शब्दाचा अपभ्रंश होऊन दुर्गुडी असे नाव पडले आहे. दुर्गथडी म्हणजे काम पूर्ण न झालेला दुर्ग ! अगदी तळापासूनच वरपर्यंत माती मुरूम आणि खडकाचे वेगवेगळे प्रकार स्पष्टपणे दिसू शकतील असा तीव्र उतार असणारा हा कडा, आम्हाला नेहमीच आमचा सवंगडी वाटला. नागरिकांना प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो तसाच या कड्याच्या अंगाखाद्यावर आम्हा पांगारकरांचे बालपण गेलेले आहे.
माहेर वासिनी आणि आजोळ म्हणून आलेल्या बच्चे कंपनीने या कड्याच्यावर असणाऱ्या पठारावर अक्षरशः मनसोक्त निसर्ग सहवास घेतलेला आहे. हजारो वर्षापासून उभ्या असणाऱ्या या कड्याचे दगड चिरा पडून आता मात्र निखळले आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांचा त्यांच्यावर परिणाम जाणवू लागलेला आहे. विकासाच्या नावाखाली या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र त्याचे दुष्परिणाम एकूणच निसर्गावर करणार आहेत. शनिवारी (दि. २४) सकाळी साडेनऊ वाजता मोठ-मोठे दगड कोसळल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. मग आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी गेलो. त्यावेळी आम्हाला त्यातील भिषणता जाणवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी झाली नाही.
ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याला लागूनच असणारी त्याहून मोठी दरड अगदी कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामस्थांनी देखील दक्षता घेणे गरजेचे आहे.