पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात गणरायासमोर आज सुमारे 500 डाळिंबांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला म्हणजेच याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे गाभा-यात या विषयाशी सुसंगत अशी आकर्षक पुष्पसजावट देखील करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सोमवारी (10 जून) पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी 4 ते 6 यावेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग होणार आहे. तर दुपारी 1 ते 3 सहस्त्रावर्तनं आणि रात्री 9 ते 11 गणेशजागर पार पडणार आहे. यावेळी दर्शनासाठी दगडूशेठ मार्गावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.