-राहुलकुमार अवचट
यवत : यवतचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्ताने यवत येथे सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचे हे 57 वे वर्ष असून आज रात्री श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा होणार आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त आज सायंकाळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथून भव्य दिंडी सोहळा सुरू झाला.
हरिपाठाचे अभंग, ज्ञानोबा- माऊली – तुकाराम, माऊली व हरिनामाच्या गजरात यवत गावातून श्रींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा करत भव्य दिंडी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात येथे दाखल झाला. अखंड हरिनामाच्या गजरात पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर अनेकांनी हरिनामाच्या, राधाकृष्ण गोपाल कृष्ण च्या गजरात बालगोपालांसह पुरुष व महिला वारकरी यांनी देखील फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
यानंतर हरिपाठ होऊन श्री काळभैरवनाथ महाराजांची आरती करण्यात आली. आज रात्री ह.भ.प पांडुरंग महाराज गिरी (वावी – सिन्नर) यांचे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन संपन्न होणार असून रात्री 12 वा. श्री नाथांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर नाथांचा गोंधळ भारुड संपन्न होईल.
दिंडी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यामुळे यवत गावाला जणू काही पालखीचे आषाढी वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी ग्रामस्थ, वारकरी, महिला भगिनी व बालगोपाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,