लोणी काळभोर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा धनगरे हिने 3 हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर सहा हून अधिक विद्यार्थिनींनी उंच उडी व रिले स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यशस्वी खेळाडूंचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
बालेवाडी येथील क्रीडा संकुलात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 3000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा व्यंकटी धनगरे हिने प्रथम क्रमाक तर सई आनंदा गावडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर प्रतीक्षा धनगरे हिची बालेवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उंच उडी स्पर्धेत रोशनी संतोष पसरटे हिने तृतीय क्रमांक तर रिले स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनी रेजिना जगत परियार, श्रावणी सूर्यकांत काळभोर, प्रतीक्षा व्यंकटी धनगरे, गायत्री दादासो विरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक मुरलीधर ठाकरे, अरविंद राठोड, विजय रोकडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुब गावडे , आजीव सेवक श्रीराम साळुंखे, संस्थेचे प्रशासन सहसचिव सीताराम गवळी, विद्या समिती प्रमुख अरुण सुळगेकर यांनी अभिनंदन केले. तर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर यांनी विजेत्य खेळाडूंचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कन्या प्रशालेच्या पर्यवेक्षक सुधाकर ओहळ, सतीश कदम, पी व्ही. पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.