लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात महागडी कबुतरे चोरणाऱ्या ४ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
दादासो हरिदास चव्हाण (वय ३०, रा. खुटबाव साळूका वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे), नागेश मारुती पवार (वय २२, रा. खुटबाव, साळुका वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे), सोमनाथ ज्ञानेश्वर खोमणे (वय २४, रा. नाझरे, सुपे, ता. पुरंदर, जि. पुणे), यश बाळाराम चव्हाण (वय २१, रा. जवळाअर्जुन, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुजित ज्ञानदेव शिंदे (वय ३५, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे पेट शॉप आहे. त्यांच्या शॉपमधील रेसर प्रकारची महागडी कबुतरे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, पोलिसांना चोरीस गेलेली कबुतरे ही खुटबाव येथील दादासो चव्हाण यांच्याकडे असून, त्याने इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केली आहे, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित खुटबाव येथे सापळा रचून दादासो चव्हाण याला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी चव्हाण यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारांसह केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच आरोपींकडून गुन्ह्यातील ३७ कबुतरे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोसले करीत आहेत.
कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक प्रदीप चौधरी, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, मुकुंद कदम, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अतुल ढेरे, विजय कांचन, जनार्धन शेळके तसेच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुभाष राऊत व महेश भोसले यांच्या पथकाने केली आहे.