पुणे : मित्र दारुच्या नशेत शिवीगाळ करत असल्याचा राग अनावर झाल्याने, मित्राचाच गळा आवळून निघृण खून करुन, मृतदेह फेकून दिल्याची खळबळजनक घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी (ता. ९) ही घटना घडल्यानंतर कोंढवा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा तपास लावत, गुन्हेगाराला अटक केली.
कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जन स्थळी ही घटना घडली. नसीम सइदुल्लाह खान (वय ३७, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे, मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कमल रोहित ध्रुव (वय १९, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. छत्तीसगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यातील दोन तपास पथके तत्काळ रवाना झाली. सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अंमलदारांसह अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. पोलीस पथकाने प्रथम मृत व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर मृत व्यक्तीचे कोणाशी वाद आहेत का? याबाबत तपास केला असता आवश्यक माहिती मिळाली नाही. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच परिस्थितीजन्य पुरावेही न आढळल्याने आरोपींबाबत माहिती मिळवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.
पोलिसांनी मोठ्या कौशल्याने घटनास्थळाजवळील वस्तीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची माहिती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे कमल रोहित ध्रुव याला ताब्यात घेतले. कमल ध्रुव याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली; पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे स्पष्ट केले.
मृत नसीम सइदुल्लाह खान दारु पिवून रोजच शिवीगाळ करत होता. तसेच घटनेच्या दिवशी देखील नसीम खान शिवीगाळ करुन बाहेर निघून गेला. तेव्हा संतप्त झालेल्या ध्रुव याने त्याच्या पाठोपाठ हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी जाऊन, गळा आवळून व नंतर तोंडावर दगड मारुन त्याला जखमी केले, त्यानंतर त्याचा खून केल्याची कबुली दिली.