पुणे : अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पुण्यातील घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणा-या चार वर्षाच्या चिमुकलीवर 40 वर्षीय मानलेल्या मानाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली घोरपडीमध्ये राहते. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपीचे चिमुकलीच्या पालकांसोबत चांगले संबंध आहेत. मागील काही वर्षीपूर्वी तो त्यांच्या घराच्या शेजारी राहत होता. त्यानंतर अर्धा किलोमीटर घरापासून लांब राहायला गेला. परंतु तो वारंवार चिमुकलीच्या घरी यायचा आणि त्या मुलीला आणि तिच्या बहीणीला खाऊ देण्यासाठी बाहेर घेऊन जायचा. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मुलीची आई घरी नसताना तो तिथे आला आणि मुलीला घेऊन गेला. ती मुलगी खूप उशीर झाला तरी घरी परतली नसल्याने चौकशी केल्यावर आरोपी त्या मुलीला घेऊन गेल्याचे समजले. आईने आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता, आरोपी तिच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले. दरम्यान, रात्री मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर पोलीसात तक्रार दाखल केली.
मुंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला व्यसनाची सवय आहे. सध्या आरोपी फरार असून मुंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहे.