वालचंदनगर : वालचंदनगर येथील रणगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. साडेचार वर्षाच्या एका मुलाने मासा पकडण्याच्या नादात विहिरीत उडी मारल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास रणगाव येथील निमसाखर गावच्या हद्दीत घडली आहे.
रुद्रा महादेव जाधव (वय-4 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी शहाजी अनंता जाधव, (वय-38 रा. रणगाव) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रणगाव येथील निमसाखर गावच्या हद्दीमध्ये असलेल्या विहिरीत महादेव जाधव हे त्यांच्या मुलांना पाच- सहा दिवसांपासून पोहायला शिकवत होते. रुद्रा आणि अक्षदा त्यांचे दोन मुले आहेत. घराजवळच पाण्याने भरलेली विहीर आहे.
दरम्यान, त्यांचे वडील महादेव जाधव यांनी दोन्ही मुलांना घराजवळ बसवून शेजारीच शौचालयाला गेले होते. त्यावेळी रुद्रा आणि अक्षदा ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेली. विहिरीमध्ये त्यांना मासा दिसल्यामुळे रुद्रा याने मासा पकडण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारली. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडेचार वाजता विहिरीतील पाणी काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब पाटील करीत आहेत.