पुणे : कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून रात्री उशिरा अथक प्रयत्नांती आग आटोक्यात आणली.
कात्रज घाटातील डोंगरावर रविवारी रात्री झाडांचा पाचोळ्याला आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याचे वाहनचालक तसेच रहिवाशांनी पाहिले. त्यानंतर वणवा भडकल्याची माहिती वागनचालकांकडून कात्रज येथील अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आग अन्यत्र पसरू न देण्याची काळजी जवानांनी घेतली. त्यामुळे घाटातील इतर भाग आगीच्या ज्वाळांपासून सुरक्षित राहिला. आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.
दरम्यान, उन्हाळ्यात शहरातील टेकड्या, मोकळ्या जागेत पडलेल्या पालपाचोळ्याला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतात. आठवड्यापूर्वी येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या आवारातील मोकळ्या जागेत वणवा पेटला होता. यापूर्वी तळजाई, वेताळ टेकडी परिसरात वणवा पेटला होता. वाढत्या उन्हामुळे वणवा पेटण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.