दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे यार्डामध्ये बाजूला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रँक मधील एका बोगीला शुक्रवारी (ता. ०३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड रेल्वे यार्डात रेल्वे गाडी उभी करण्यात आली होती. या रेल्वेच्या रँक मधील एका बोगीला अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. क्षणार्धात ही आग चांगलीच पेटली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
रेल्वे प्रशासनाने तातडीने दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशामक गाडी मागवून आग आटोक्यात आणली. परंतु ही आग कशी लागली याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून तर्कवितर्क काढले जात आहेत. विशेष म्हणजे ज्या बोगीला आग लागली तेथून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा हा केवळ पन्नास फुटावर होता.
दरम्यान, जर दौंड नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहोचली नसती तर संपूर्ण गाडीनेच पेट घेतला असता या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत होते. रेल्वे अधिकारी पुढील तपास करत आहेत.