पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेत आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. राहुल कुलकर्णी असं मृत्यू झालेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची तीन मजली इमारत असून, तेथे बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास या संस्थेत भीषण आग लागली. आग भडकल्याने त्याची झळ वसतिगृहातील खोल्यांपर्यंत पोहाेचली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली.
वसतिगृहातील ४० विद्यार्थिनीं सुखरूप
वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात अग्निशमन जवानांना यश आले आहे. संस्थेच्या कार्यालयात वसतिगृह व्यवस्थापक राहुल कुलकर्णी झोपले होते. त्यांना खोलीतून बाहेर पडता आले नसल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, आग लागल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीत वसतिगृहात ठेवलेले शैक्षणिक साहित्य जाळून खाक झाले आहे.