लोणी काळभोर, (पुणे) : विहिरीचे पाणी बघायला जात असताना, फुटबॉलच्या दोरीत पाय अडकून विहिरीत पडल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ढेलवस्ती परिसरात सोमवारी (ता.२७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी काळभोर सह परिसरात शोककळा पसरली आहे. नबाबाई नामदेव महानवर (वय-५९, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नबाबाई महानवर या दररोज आपल्या शेतात काम करीत होत्या. नेहमीप्रमाणे त्या सोमवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी तीन वाजता लाईट येणार असल्याने मोटार चालू करावी लागेल, या हेतूने नबाबाई विहिरीतील पाणी बघण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विहिरीकडे चालल्या होत्या. नबाबाई या विहिरीजवळ गेल्यानंतर विहिरीतील फुटबॉलच्या दोरीत त्यांचा पाय अडकला आणि त्या विहिरीत पडल्या.
दरम्यान, सोमवारी दुपारी तीन वाजता लाईट आल्यामुळे नबाबाई महानवर यांचे नातेवाईक मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेले. तेव्हा त्यांना नबाबाई या विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले. त्यांनतर नातेवाईकांनी त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
महानवर कुटुंबावर कोसळला दुख:चा डोंगर
नामदेव महानवर यांचेही यापूर्वी निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आई नबाबाई महानवर यांनी घराची जबाबदारी स्वीकारली. आणि शेती करून कुटुंबाचा गाडा हाकला. मात्र नबाबाई महानवर यांचाही आज सोमवारी विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे चारही मुलामुलींचे आईवडिलांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे महानवर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तर या दुर्घटनेचे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.