पुरंदर : पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील प्रयोगशील शेतकरी एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढत आहेत. मांडकीतील प्रयोगशील शेतकरी दीपक सावंत व जयंत सावंत या बंधूंनी एकरी १०२ टन उसाचे उत्पादन घेतले होते. तसेच प्रयोगशील शेतकरी मानसिंग जगताप यांनी एकरी १०६ टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
त्यानंतर आता युवा शेतकरी सचिन गायकवाड यांनी १०७ टन उसाचे उत्पादन घेत उच्चांक प्रस्थापित केला आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद गायकवाड यांनी चालू हंगामामध्ये एकरी १०७ टन उत्पन्न घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे सचिन गायकवाड या शेतकऱ्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.
नियोजनाचा सुरेख मेळ, यशाचा मंत्र
कोणत्या रासायनिक खतांचा केला वापर
सचिन गायकवाड यांनी शेणखताचा वापर केला. को-८६०३२ उसाच्या रोपाची लागवड दोन फूट अंतरावर केली. ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून शेणखत, गांडूळखत, जीवामृत, डी. कंपोजर आणि रासायनिक खतांचा वापर केला. मोठ्या बांधणीला रासायनिक खत व कोंबड खत टाकले होते. बांधणीनंतर दोन महिन्यांनंतर एक खताचा डोस देत पाचट काढले. खतांचे मार्गदर्शन वीर येथील सचिन बनकर यांनी केले.
खर्च किती झाला?
रासायनिक खतांचा ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत एकरी खर्च पंचवीस हजार आला. रोपे, नांगरणी, सरी, लागवड इतर खर्च तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी झाला आहे. एकूण एकरी खर्च साठ हजार रुपये झाला. काढणीस आलेल्या एका उसाच्या टिपऱ्या ४६ ते ४८ इतक्या होत्या. एका उसाचे वजन साडेतीन ते चार किलोदरम्यान होते, अशी माहिती सचिन गायकवाड यांनी दिली.