पुणे : पुण्याचे पोलीस आय़ुक्त अमितेश कुमार यांच्या एका पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात एखादी अतिरेकी संघटना सतत गर्दीने गजबजणाऱ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पत्र लिहून धोका असल्याचं आयुक्तांनी कळवलं आहे.
याबाबत शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला अमितेश कुमार यांनी पत्र लिहून व नोटीस बजावताना हा धोक्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत अनेकदा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनांनी अनेकदा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचा भंग केला आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटिशीतून करण्यात आला आहे.
दरम्यान, या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असून आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण गाठून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून अनु शकते. त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये, असं या नोटीसीद्वारे विचारण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.