सागर जगदाळे
भिगवण : डॉक्टर म्हणजे देवाचेच दुसरे रूप असे म्हंटलं जाते. पण कधीकधी हेच डॉक्टर निर्दयी बनतात. या जगात असे ही काही डॉक्टर असतात की जे आपल्या कर्तव्याप्रती दिवस आहे की रात्र हे न पाहता आपल्या कर्तव्य बजावतात. कितीही मोठा शत्रू असला तर त्यावर मोठं संकट ओडावले तर अशावेळी आपले मतभेद विसरून मदतीसाठी धावतो. मात्र भिगवण (ता. इंदापूर) येथे एक नवीन जीव जगात जन्माला येयचा होता, त्याच वेळेस या बाळाला समजले असेल की इथला मानव हा किती निष्ठुर आहे.
पुणे सोलापूर महामार्गालगत एका दवाखान्यासमोरच एका महिलेची प्रसूती झाली. ती महिला कर्नाटक मधील असून तिचे नाव सीताबाई चव्हाण असे आहे. कर्नाटक वरून ती अलिबाग या ठिकाणी मजदूरीचे काम करण्यासाठी आपल्या परिवारासोबत चालली होती. त्यांची गाडी रविवारी (ता.१२) मध्यरात्रीच्या सुमारास भिगवण जवळ आली असता, त्यांना अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यानंतर चालकाने महामार्गलगत असणाऱ्या सागर हॉटेलच्या शेजारी असलेल्या दवाखान्यासमोर गाडी उभी केली.
त्यानंतर नातेवाईकांनी चव्हाण यांना दवाखान्यात घेण्यासाठी वॉर्डबॉय ला विनंती केली, मात्र त्याने डॉक्टर दवाखान्यात नाहीये असे सांगून सरळ जबाबदारी झटकून दिली. आणि थोडीशीही दया दाखविली नाही. कमीत कमी त्या महिलेला तरी आत घेणे गरजेचे असताना तेवढी ही तसदी त्याने घेतली नाही. शेवटी भयंकर कळा सोसत असलेली महिलेच्या वेदना उपस्थित असणाऱ्या काहीजणांना बघविल्या नाहीत. म्हणून त्यांनी अंबुलन्स चालक केतन वाघ याला माहिती दिली.
हि माहिती समजताच केतन वाघ यांनी लाईफलाईन दवाखान्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगिता डेरे (भोसले) यांना कल्पना दिली. त्यांनीही आपले परमकर्तव्य समजून रात्री दोन वाजण्याच्या सुमारास न गेट न उघडलेल्या दवाखाण्याच्या समोर वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेच्या मदतीला धावून गेल्या व महिलेची प्रसूती योग्य पद्धतीने पार पाडली. लगेच त्यांना केतन वाघ यांनी अंबुलन्स मधुन बाळाला व बाळाच्या आईला लाईफलाईन दवाखान्यात दाखल केले. अचानकपणे ओढवलेल्या संकटामुळे मजुरी करणारे चव्हाण कुटुंबीय पूर्णपणे भेदरलेले असताना डॉ.योगिता डेरे यांच्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुखाची लकेर उमटली.
दरम्यान, सदर प्रसंगावरून एका बाजुनेआपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक नसणाऱ्या वस्तुस्थिती चे दर्शन घडले तर दुसरीकडे समाजाप्रति आपले आद्य कर्तव्य मानून डॉ. योगिता यांनी दाखविलेली माणुसकी समाजात आजपण माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन घडविले आहे. तर भिगवणमध्ये रात्री घडलेला प्रकार हा निंदनीय आहे. ज्या दवाखान्याने प्रसुतीच्या कळा सुरु असलेल्या मातेसाठी दरवाजाच उघडला नाही. त्यावर प्रशासन काय कारवाई होणार का? अशी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.