हडपसर : पुणे सासवड मार्गावरील सातववाडी येथे डंपरने दिलेल्या धडकेत बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (ता. १९) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
नीलेश साळुंखे (वय- ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकीची नावे आहेत. तर दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्यप्रदेश) याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश साळुंखे हे मुलगी मीनाक्षी हिला शाळेत सोडविण्यासाठी फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यांची दुचाकी सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर आली असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या डंपरने भरधाव वेगाने धडक दिली.
या अपघातात निलेश हे डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला, तर मुलगी मीनाक्षी हिला नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. परंतु, मीनाक्षीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, ट्रकचालक दिलीप कुमार पटेल याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.