सागर जगदाळे
भिगवण : भिगवण-राशीन रोडलगतच्या भंगार दुकानात लोखंडी बॅरेल कट करीत असताना गॅस कटरचा पाईप मधूनच तुटल्याने झालेल्या अपघातात एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
जखमी परप्रांतीय कामगाराचे नाव धन्विंदर चौधरी (वय ४६) असे आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून, भिगवण-राशीन रोडलगत मानवी वस्तीजवळ असणाऱ्या भंगार दुकानात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भंगार भरण्यासाठी ट्रक आला होता. त्याचवेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती, भिगवण येथील जागेत गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी बॅरेल कट करण्याचे काम धन्विंदर चौधरी हा करीत होता. त्याच वेळेस अचानक ऑक्सिजनच्या टाकीचा व एलपीजी गॅस टाकीचा पाईप अचानक तुटला व मोठा आवाज होऊन एक लोखंडी बॅरेल हवेत उंच उडून साधारणपणे २० ते २५ फूट लांब जाऊन पडले.
या ऑक्सिजन टाकीच्या व एलपीजी गॅस टाकीच्या हवेच्या दाबाने मोठाले धुळीची लोट याठिकाणी उडाले व अचानक एवढा मोठा आवाज झाला म्हणून शेजारी राहणारे नागरिक घराबाहेर आले. त्यावेळी धन्विंदर चौधरी हा कामगार मोठ-मोठ्याने ओरडत होता. जवळ जाऊन पाहिले असता त्याचे दोन्ही पाय या स्फोटाने पूर्णपणे निकामी झाले होते. लागलीच ‘आपुलकीची सेवा’ या ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ घटनास्थळी पोहोचले व या परप्रांतीय कामगाराला पुढील उपचारासाठी तक्रारवाडी येथील लाईफ-लाईन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक यंत्र पाहायला मिळाले नाही. येथे कोणत्याही प्रकारची परवानगी होती का ते पाहणे महत्त्वाचे असून, मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारे अवैधरित्या गॅस कटर वापरता येतो का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.